Kohoj Fort



काही गड हे त्यावरील इतिहासाने तर काही त्याच्या भूगोलाने आकर्षित करतात. पालघर जिल्ह्य़ातील कोहोज गड मात्र त्यावरील एका प्रस्तरआकृतीने लक्षात राहतो.
महाराष्ट्रातील किल्ल्यांची भटकंती करीत असताना प्रत्येक किल्ला त्याच्या वैशिष्टय़ांमुळे प्रेमात पाडतो. काही किल्ल्यांवरील प्राचीन अवशेष, काहींची थरारक चढाई, काहींभोवतीचे घनदाट जंगल, तर काही किल्ल्यांशेजारचे गगनाला भिडलेले नानाविध आकाराचे सुळके, अशा एक ना अनेक कारणांमुळे त्या-त्या गडाची भटकंती आपल्या स्मृतिपटलावर कायमची कोरली जाते. पालघर जिल्ह्य़ातील वाडा तालुक्यात निसर्गाच्या विस्मयकारक अदाकारीने लक्षात राहणारा असाच एक किल्ले कोहोज! या गडाच्या माथ्यावरील नैसर्गिकरीत्या तयार झालेल्या मानवी आकारातील कातळकृतीने हा कोहोज दुरूनही लक्ष वेधून घेतो.
समुद्रसपाटीपासून ५७६ मीटर उंचीवर असलेल्या या किल्ल्यास भेट देण्यासाठी आपणास पालघरला पोहोचावे लागते. पालघरच्या एस.टी. स्थानकावरून सकाळी पावणेसात वाजता गडपायथ्याच्या नाणे गावासाठी बस सुटते. ही बस जर चुकली तर पहिल्यांदा मनोर गाव गाठावे. मनोर गावाहून साधारण दोन कि.मी. अंतरावर मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मस्तान नाका नावाचे ठिकाण आहे. येथून नाणे गाव साधारण बारा कि.मी. अंतरावर असून, नाक्यावर अनेक खासगी वाहने गडपायथ्याच्या नाणे गावास जातात. मस्तान नाक्यावरून मिळेल त्या वाहनाने तासाभराचा प्रवास करून आपण नाणे गावात दाखल व्हायचे. नाणे गावातील मुख्य चौकातच ध्वजस्तंभ असून, त्याचे शेजारीच ग्रामस्थांनी कोहोज गडावरील तोफ एका चौथऱ्यावर ठेवलेली आहे. आपण ही तोफ पाहून गावातून जाणाऱ्या वाटेने गडाकडे प्रस्थान करायचे. गड येईपर्यंत वाटेत पाणी नसल्यामुळे पाण्याच्या बाटल्या इथेच भरून घ्यायच्या.
साग व ऐनाच्या गर्द झाडीतून पायवाट पुढे-पुढे सरकते. घाम काढणारी, पण जंगलामुळे हवीहवीशी वाटणारी ही चढाई थोडय़ा वेळातच डोंगरसोंडेवर घेऊन येते. या डोंगरसोंडेला येऊन मिळालेली आणखीएक पायवाट वाघोटे गावाकडून इथपर्यंत येते. येथून डाव्या हातास जाणाऱ्या पायवाटेने डोंगराच्या काठाकाठाने आपण चालत राहायचे. पुढे आणखी चढाई केल्यानंतर आपण एका मोकळ्या पठारावर येऊन पोहोचतो व समोरच प्रचंड जहाजासारखा कोहोजगड दिसतो. नाणे गावातून या पठारावर पोहोचेपर्यंत साधारण दीड तास लागतो. पण ही चढाई जंगलातून असल्यामुळे फारसा थकवा जाणवत नाही. या पठारावरून आपण कोहोजगडचा कातळ डाव्या हातास ठेवत मळलेल्या वाटेने पुढे चालत राहायचे. अध्र्या तासात आपण कोहोजगडाच्या भग्न दरवाजात येऊन पोहोचतो. गडाच्या माचीत प्रवेश केल्यावर उजव्या हातास कोहोजचा बालेकिल्ला दिसतो. समोरच दिसते छोटेखानी कुसमेश्वर मंदिर! शेजारीच पाण्याची दोन टाकी पण त्यांचे पाणी पिण्यायोग्य राहिलेले नाही. कुसुमेश्वर मंदिराच्या मागे एक अत्यंत सुंदर, सुस्थितीतील शिल्प आहे. हे शिल्प पाहून गडाच्या माचीच्या एका कोपऱ्यावर असणाऱ्या सहा टाक्यांच्या समूहाजवळ पोहोचायचे. गडावर कोणतीच वास्तू मुक्कामयोग्य नसल्यामुळे गडास भेट देणारे या टाक्यांशेजारील सपाटीवर तळ ठोकतात. त्यांच्या राहण्याची निशाणी म्हणून तेथे तीन-चार दगडी चुली अगदी कायमस्वरूपी केल्यासारख्या बनविलेल्या आहेत.
माचीतील हे दुर्गावशेष पाहून बालेकिल्ल्याकडे कूच करायचे. बालेकिल्ल्याच्या खालच्या अंगावर एक भक्कम बुरूज बांधलेला असून, त्याच्या माथ्यावर हनुमंताची छोटी देवडी आहे. बालेकिल्ल्याचा हा पहिला टप्पा पक्की तटबंदी बांधून बंदिस्त केला असून, उजव्या हाताच्या गडाच्या कातळात तीन खांबटाकी कोरलेली आहेत. यातील पहिली दोन टाकी खराब असून, तिसऱ्या टाक्यातील थंडगार पाणी मात्र चढाईचा थकवा घालविणारे आहे. आपण या टाक्यातील पाण्याची चव चाखायची व कातळात खोदलेल्या छोटय़ा पावटय़ांनी बालेकिल्ल्याच्या दरवाजाकडे चालू लागायचं. दोन बुरुजांमध्ये बंदिस्त असा पश्चिमाभिुख महादरवाजा आहे. या दरवाजाच्या माथ्यावरची कमान आज शाबूत नसली तरी ती पाहिल्यानंतर सिंहगडाच्या कल्याण दरवाजाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही.
बालेकिल्ल्यात डाव्या हातालाच हनुमंताची छोटी घुमटी असून, त्यातील मारुतीचे शिल्प देखणे आहे. कोहोज बालेकिल्ल्याच्या मध्यभागी दोन सुळके असून, या दोन्ही सुळक्यांच्या माथ्यावर जाता येते. इथून सभोवतालचा परिसर फारच सुंदर दिसतो. या दक्षिण टोकावर पोहोचल्यावर मागे वळून पाहिल्यावर दुसऱ्या सुळक्याचा निसर्गनिर्मित मानवाकार पाहून आपण काही क्षण थक्क होऊन जातो. मूळ काळ्या पाषाणाच्या मानवी देहासारख्या आकारावरील गोल दगडामुळे, म्हणजेच डोक्यामुळे या अमूर्त कातळाला मूर्त शिल्पाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. निसर्गनिर्मित मानवी पुतळ्याचे रूप कॅमेऱ्यात टिपून घ्यायचे व गडाच्या दक्षिण टोकावरील घुमटीकडे चालू लागायचं. या घुमटीत अलीकडेच कोणीतरी श्रीकृष्णाची मूर्ती बसविलेली आहे. आपण हे मंदिर पाहून आल्यावाटेने परत बालेकिल्ला उतरायला सुरुवात करायची. उतरताना खाली डाव्या हातास दोन पाण्याची टाकी दिसतात. पण ती पाणवनस्पतीने पूर्णपणे झाकलेली आहेत.
शिवरायांनी कोहोजगड १६५७ च्या दरम्यान जिंकून स्वराज्यात सामील करून घेतला. पुढे १२ जून १६६५ च्या पुरंदरच्या तहानुसार मोगलांना जे २३ किल्ले शिवरायांनी दिले, त्यात कोहोजगडाचा देखील समावेश होता. यानंतर ११ जून १६७० रोजी मराठय़ांनी हा गड परत जिंकून स्वराज्यात आणला. संभाजीराजांच्या कारकीर्दीत मोगलांचा मनसबदार व जव्हारचा जमीनदार विक्रम पतंगराव याने ७ एप्रिल १६८८ रोजी कोहोजगडाचा ताबा घेतला. असा हा निसर्गनिर्मित वैशिष्टय़ लाभलेला कोहोजगड दुर्गअवशेषांनीही श्रीमंत असून, ठाणे जिल्ह्य़ातील डोंगरी किल्ल्यात हा गड आपले वेगळेपण सिद्ध करणारा आहे.

Comments

Popular posts from this blog

Agritourism

Benefits of agro-tourism

Need of organic farming